रविवार १ एप्रिल २०१२

धृपद संसार

IIT मध्ये शिकत असताना पंडित नयन घोष ह्यांच्याकडून संगीत शिकायला मिळाले ही फारच मोठी भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी!! इतक्या मोठ्या संगीताच्या उपसकाकडून आम्हाला IIT मध्ये बरेच काही शिकायला मिळाले. भारतीय शास्त्रीय संगीत आणि ह्या कलेचा इतिहास आम्हाला गुरुजींनी अगदी सुरस पद्धतीने आणि सोप्पं करून, आमच्या पातळीवर येऊन सांगितले आणि आमच्यापैकी बऱ्याच लोकांचा कानसेन ते तानसेन असा प्रवास सुरु झाला!! म्हणजे ही फक्त सुरुवात आहे आणि आता ह्या प्रवासाला इतका उशीर झालाय की तानसेन स्टेशन येणारच नाही.. पण म्हणून ह्या प्रवासाचा आनंद लुटू नये असं थोडंच आहे? ह्या उशिरा चालू झालेल्या प्रवासामधल्या काही आठवणी...

IIT मध्ये असताना SPIC MACAY च्या मैफिलींना न चुकता हजेरी लावणाऱ्या लोकांचा एक मस्त group झाला होता!! म्हणजे ओळख नसली तरी हे ओळखीचे चेहेरे सगळीकडे दिसायचे!! असेच सगळे हे ओळखीचे लोक एकत्र जमले होते सितारीच्या संध्या-मैफिलीसाठी!! प्रयोजन होते ते IIT मधल्या पवई वाटीकेच्या उद्घाटनाचे.. नेहेमीप्रमाणे भाषणबाजी झाल्यावर खऱ्या कार्यक्रमाला सुरुवात झाली!! संध्याकाळची वेळ आणि आम्ही सगळे पवई तलावाच्या बाजूला बसलो होतो.. शांत वातावरण  होतं.. सूर्यास्त होत होता आणि पंडितजींनी पुरिया रागाने सुरुवात केली. वातावरण अगदी थोड्याच वेळात भारून गेले.. आम्ही सगळे त्या अनुभवाचे एक घटक होतो. असं संगीत ऐकायला मिळत होतं की थेट काळजाचा वेधच घेतला गेला.. ही पहिली मैफिल जिथे मी प्रथम माझ्या गुरुजींना बघितलं!! मी इतका भारावून गेलो होतो त्या संगीताने की जाऊन पंडितजींशी बोलावं असं वाटत होतं, पण धीर नाही झाला..

आणि थोड्याच दिवसांनी notice आली की पंडित नयन घोष IIT मध्ये संगीत शिकवण्यासाठी विशेष अध्यापक म्हणून रुजू होणार!! अजिबात वाट न बघता मी लगेच माझं नाव नोंदवलं, आणि क्लासचा पहिला दिवस आला. क्लासला जायचं जरा tension आलं होतं, इतकी मोठी व्यक्ती आपल्याला शिकवणार.. त्यात अश्या सगळ्या ऐकीव कथा संगीतातल्या मोठ्या मोठ्या गुरूंच्या.. त्यांचा विक्षिप्तपणा, त्यांचा लहरीपणा, त्यांची कडक शिस्त.. आणि tension  बरोबरच कुतूहलसुद्धा होतं!! नेहेमीप्रमाणे पुष्पगुच्छ देवून गुरुजींचं स्वागत केलं आणि मग गुरुजींनी बोलायला सुरुवात केली. त्यांच्या बोलण्यातून त्यांचा साधेपणा लगेच कळून आला. मग ओळख परेड चालू झाली.. सगळ्यांनी आपापली ओळख करून दिली, शर्माने कर्नाटकी शैलीमध्ये एक गाणे म्हणून दाखवले आणि मग पुढच्या आठवड्यातली वेळ ठरवून आम्ही आपापल्या होस्टेल मध्ये परतलो. पहिल्याच दिवशी गुरुजींना भेटल्यावर tension शून्य झालं आणि उत्साह शतगुणित!! मग त्याच्या पुढच्या आठवड्यापासून क्लास चालू झाले आणि पहिल्याच क्लास मध्ये कळलं की इतक्या मोठ्या व्यक्तीकडून शिकण्याचे फायदे कसे असतात!! साधे सा, रे, ग, म चे अलंकार शिकवले पहिल्या २/३ क्लास मध्ये. पण ते ज्या पद्धतीने शिकवले त्यावरून कळत होतं की हे काहीतरी वेगळंच आणि खास आहे!! आणि मी मनोमन ठरवलं की ह्या क्लासचा जितका करता येईल तितका फायदा करून घ्यायचा, अजिबात आळशीपणा करायचा नाही, आणि ही संधी सोडायची नाही, कारण अशी संधी पुन्हा पुन्हा नाही मिळत!!

आमचे क्लास दर मंगळवार आणि बुधवारी असायचे. मंगळवारी संध्याकाळी आणि बुधवारी सकाळी गुरुजी आम्हाला शिकवायचे. आणि बुधवारी संध्याकाळी music appreciation batch असायची!! ह्या वेळेत गुरुजींनी आमची भारतीय शास्त्रीय संगीताची ओळख करून दिली. शास्त्रीय संगीताचा इतिहास, त्यामध्ये कालपरत्वे झालेले बदल, भारतीय शास्त्रीय संगीतामधल्या वेगवेगळ्या विचारधारा सगळं अगदी मस्त शिकवलं. एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते.. आपल्याकडे इतिहास शिकवण्याच्या अनेक कंटाळवाण्या पद्धती आहेत. सगळेचजण ह्या त्रासामधून गेले असतात लहानपणी. पण गुरुजींनी आम्हाला इतिहास इतका रंजक पद्धतीने शिकवला की बरेच दिवसांनी लक्षात आलं की आपल्याला इतिहास शिकवलाय!! त्यानंतर आमचे कान शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी तयार करायला म्हणून मग गुरुजी अनेक नव्या/जुन्या गायक, वादकांच्या दुर्मिळ ध्वनिफिती क्लास मध्ये घेवून यायचे. दर बुधवारी मग ऐकण्याचा तास असायचा!! हा पण एक नवीन अनुभव होता.. वेगळाच.. एकेक दिवस एकेक विचारधारा पकडायची. कधी एखादा राग आणि त्याचे वेगवेगळे भाव तर कधी एखादा गायक अथवा वादक आणि त्यांनी सदर केलेले वेगवेगळे राग. कधी एक राग आणि त्याचं गायकाने केलेले सादरीकरण आणि वादकाने केलेले सादरीकरण, त्यातला फरक समजावून देणे.. गायकांच्या आणि वादकांच्या खासियती, त्यांच्या घराण्याची वैशिष्ट्ये!! अश्याच दोन सत्रांमध्ये मिळून गुरुजींनी तबल्याची ओळख करून दिली. ताल, लय समजावून दिली. गुरुजींकडे अतिशय जुन्या बंदिशींचा तर खजिनाच आहे.. त्यामधल्या अनेक बंदिशी तर गुरुजींनी शिकवल्याच पण त्याच बरोबर अनेकवेळा त्यांनी आमच्या समोर बंदिश रचली आणि आम्हाला लगेच शिकवली.. अश्याचपैकी बैरागी रागामधला एक तराणा फारच भारी आहे.

क्लास व्यतिरिक्तसुद्धा गुरुजींबरोबर बरेच वेळा मला चर्चा करायची संधी मिळाली. गुरुजी कधी आमच्या होस्टेल मध्ये जेवायला यायचे तर कधी आम्ही मंगळवारी रात्री क्लास झाल्यावर तानसा कॅन्टीन मध्ये जेवायला जायचो!! त्यावेळी गुरुजींबरोबर अनेक वेळा वेगवेगळ्या विषयांवर मी बोललो. केवळ संगीत नाही तर इतरही अनेक विषय!! आणि मी फारच भाग्यवान समजतो स्वतःला की मला इतका वेळ गुरुजींबरोबर मिळाला, इतकं काही शिकायला मिळालं... गुरुजींच्या वडिलांनी अतिशय परिश्रम घेवून भारतीय शास्त्रीय संगीताचा ज्ञानकोश लिहायला घेतला. तो ज्ञानकोश गुरुजींनी पूर्ण केला आणि Oxford University Press ने प्रकाशित केला त्यावेळी आमच्यापैकी बरेच जण IIT मध्ये होतो.. त्यावेळी जवळजवळ ३० वर्षांपासून बाळगलेलं, पाहिलेलं गुरुजींचं स्वप्न आम्ही पूर्ण झालेलं बघितलं!!

आमच्या क्लासची खासियत म्हणजे गुरुजींनी आम्हाला गाणं कसं गायचं, इतकंच नाही शिकवलं तर संगीत जगायला शिकवलं. संगीताच्या क्लासमुळे IIT मधलं शेवटचं दीड वर्ष फार पटकन गेलं आणि IIT नंतरचे सहा महिनेसुद्धा फार जास्त वाटतायत गाण्याच्या क्लास शिवाय!! गुरुजी कधी परत येतोय आणि क्लास सुरु करतोय असं झालंय..

1 टिप्पणी:

Bharatiya Yuva म्हणाले...

मराठी ब्लोगर्स साठी सुवर्ण संधी..
आपला मराठी ब्लॉग ... http://www.marathiblogs.in/ वर जोडा
आणि 4 जीबी चा पेनड्राइव जिंकण्याची संधी मिळवा.
जगातील सर्वात मोठ्या मराठी ब्लॉग्स च्या नेटवर्क मध्ये सहभागी व्हा..